भारत जोडो न्याय यात्रेचे मालेगाव शहरात उत्स्फुर्त स्वागत! राहुल गांधींच्या रोड शोला जोरदार प्रतिसाद
मालेगाव : ढोल-ताशांचा निनाद, डीजेचा दणदणाट व फटाक्यांच्या आतषबाजीत काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.चाळीसगाव फाटा, दरेगाव नाका येथे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. दरेगावपासून ते मोतीबाग नाक्यापर्यंत काढण्यात आलेल्या रोड शोला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
राहुल गांधी यांच्या रोडशोपुर्वी शहरातील जुन्या महामार्गावरील सुपर मार्केट समोर चौक सभा पार पडली. यांनतर येथून रोडशोला सुरुवात झाली. नवीन बसस्थानक, जुना आग्रा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोसम पुल, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, निसर्ग चौक, मोतीबाग नाका या जुन्या महामार्गावरुन गिरणा पुलापर्यंत रोडशो पार पडला. राहुल गांधी हात उंचावून रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांना अभिवादन करत होते. चौक सभा व रोडशोला महिलांची उपस्थिती अत्यंत नगण्य होती.
रोडशो दरम्यान अनेक कार्यकर्ते राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन करीत होते. या दरम्यान जुन्या महामार्गावरील वाहतूक एकतर्फी करण्यात आली होती. अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. दीड तासाच्या रोडशो दरम्यान जुन्या महामार्गावरील प्रमुख चौकात वाहतूक खोळंबली होती. रमजानमधील उपवास (रोजे) असल्यामुळे पुर्व भागात उपस्थितीवर काहीसा परिणाम झाला. रोडशोमध्ये कॉंग्रेससह महाविकास इंडिया आघाडीचे कार्यकर्तेही बहुसंख्येने सहभागी झाले होते. शहर व वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
रोडशो दरम्यान सर्व चौकांमध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. शिवतिर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ढोल पथकाने श्री. गांधी यांचे स्वागत केले. मोसम पुल चौकातही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्यांना राहुल गांधींचे विशेष आकर्षण होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरीक, तरुण गांधी यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना राहुल सर, राहुल सर असे मोठ्या ओरडून त्यांचे लक्ष वेधत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थितांना हात उंचावून व हात हलवून अभिवादन करत होते.
टिप्पण्या