ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना धक्का ; न्यायालयाने जामीन चौथ्यांदा फेटाळला!

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना धक्का ; न्यायालयाने जामीन चौथ्यांदा फेटाळला!

मालेगांव कोर्ट बातमी: जिल्हा बँक कर्ज गैरवापराच्या प्रकरणात मालेगाव न्यायालयात सुनावणी झाली


मालेगांव :-शिवसेना(ठाकरे गट) नेते अद्वय हिरे यांना गुरुवारी पुन्हा एकदा न्यायालयाने धक्का दिला. जिल्हा बँक कर्ज प्रकरणाच्या गैरवापर प्रकरणी हिरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    मालेगावच्या राजकारणात सुरू असलेल्या हिरे कुटुंबीय विरुद्ध पालकमंत्री दादा भुसे या राजकीय नाट्यात पुन्हा एकदा अद्वय हिरे यांना सेटबॅक बसला. मालेगाव न्यायालयाने जिल्हा बँकेच्या कर्ज प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात चौथ्यांदा त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे हिरे यांना हा मोठा धक्का मानला जातो.
     जिल्हा बँकेकडून रेणुका सहकारी सूतगिरणीला 7.48 कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. एक कर्ज तीन टप्प्यात वितरित करण्यात आले यातील दोन टप्प्यात बँकेने कर्ज वितरणाची शिफारस केलेली नव्हती. सूतगिरणी प्रकल्प उभारणीसाठी दिलेल्या या कर्जाच्या उपयोग प्रत्यक्ष सूतगिरणीसाठी झाला नाही. मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम अन्य बँकेच्या खात्यात वर्ग करण्यात आली. हे करताना बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले.

विशेष म्हणजे ज्या व्यंकटेश बँकेत हा निधी वर्ग झाला त्याचे अध्यक्ष प्रशांत हिरे होते ज्या संस्थेला कर्ज मंजूर झाले त्या रेणुका देवी सूत गिरणीच्या अध्यक्ष स्मिता हिरे होत्या. या कालावधीत अद्वय हिरे स्वतः जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर करून हे कर्ज मंजूर केल्याचा बँक प्रशासनाचा आरोप आहे.

    या प्रकरणात अद्वय हिरे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. अटक झाल्यानंतर मालेगाव सत्र न्यायालय तसेच जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन दिला नव्हता. सध्या उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठीचा त्यांचा अर्ज प्रलंबित होता. मात्र आरोप पत्र दाखल केल्याने त्यांनी उच्च न्यायालयातून आपला अर्ज मागे घेत मालेगाव न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. हिरे यांचा या प्रकरणात तिसऱ्यांदा जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.

  मालेगावच्या राजकारणात पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात राजकारण पेटले आहे. भुसे यांच्या अप्रत्यक्ष डावपेचांतून हिरे यांच्या विरोधात विविध पोलिस केसेसचा ससेमीरा सुरू आहे. या खटल्यामुळे अद्वय हिरे सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. विशेष म्हणजे भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे हिरे यांच्या संबंध कुटुंबीयांविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात देखील मालेगावच्या न्यायालयात एक याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत शिवसेनेच्या शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे राजकारण पोलिस आणि न्यायालयाच्या प्रक्रियेत अडकल्याचे दिसते.

टिप्पण्या