बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची एसआयटी चौकशी:शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा; आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश

बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची एसआयटी चौकशी:शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा; आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश

नागपूरसह संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची या विषयाची समज आणि ज्ञान असणाऱ्या वरिष्ठ आयएएस तसेच आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. 
    शिक्षण देणे हे पुण्याचे काम आहे. परंतु दुर्दैवाने शिक्षण विभागातच सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो, असा घणाघाती आरोप भाजप आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांना धारेवर धरताना केला. त्याला उत्तर देताना दादा भुसे यांनी नागपूर विभागात बनावट शालार्थ आयडीचा वापर करून काही चुकीचे प्रकार झाले आहे, हे मान्य केले. ते म्हणाले, या संदर्भात चौकशीसाठी पोलिस विभागाची एसआयटी स्थापन केली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून समांतर तपास सुरू आहे. आतापर्यत १९ जणांवर फौजदारी कारवाई झालेली आहे. शालेय शिक्षण विभागातील संचालक (योजना) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कायद्या प्रमाणे कारवाई निश्चितपणे केली जाईल, असे भुसे यांनी सांगितले.

नागपूरमध्ये शिक्षक भरती घोटाळा गाजत आहे. दिवंगत शिक्षणाधिकारी सोमेश्वर नेताम यांच्या बोगस सह्या घेऊन २०१२ ते २०१९ दरम्यान काही शिक्षकांची भरती करण्यात आली. कोरोना नंतर या शिक्षकांना स्थायी दाखवण्यात येऊन त्यांचे त्या वर्षाचे एरीयर्स व पगार काढण्यात आले. शिक्षण विभागातील सर्वांनीच हे पैसे वाटून घेतल्याचे दटके म्हणाले. या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे काय? यात नेमण्यात आलेल्या सगळ्यांची तपासणी करणार आहात काय? बोगस शिक्षकांचे देण्यात आलेले पगार वसूल करणार आहात काय? शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष तीन वेळा बदलले. कारण तीघांवरही गुन्हे दाखल झाले. तर त्यातील दोघांना अटक झाली. त्यामुळे समितीवर या विषयाची समज असणारे योग्य अधिकारी नेमणार काय? असा प्रश्नांचा भडीमार दटके यांनी केला.

राज्यात बनावट शालार्थ आयडीचे प्रस्ताव मान्य करीत २७०० शिक्षक नेमले आहेत. यावर आरोप निश्चित केले आहे काय? याच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीत या विषयाची समज असणारे अधिकारी आहेत का? नुसता नागपूर विभागच नव्हे तर महाराष्ट्रातील इतरही विभागांमध्ये झालेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करणार आहात काय? असे अनेक सवाल आमदार दटके यांनी केले.नागपूर विभागातील अधिकारी नकोया प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यत नागपूर विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याची उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये. नागपूर विभागातील प्राथमिकसह माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी बदलले नाहीतर हा घोटाळा थांबणार नाही असे दटके म्हणाले. आज नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालय, वेतन पथकातील एकही अधिकारी भीतीपोटी काम करायलाच तयार नाही. अनेकांनी बहुतांश जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहे. त्यातील काहींना मिळाले आहे. मिळाले नाही ते फरार आहेत, याकडे दटके यांनी लक्ष वेधले. 

टिप्पण्या